आता श्रावण महिना सुरु होणार म्हणून मांसाहार पोट फुटेपर्यंत करा, प्यायची तेवढी दारू प्या आणि गटारात लोळून घ्या (अगदी शब्दशः नव्हे) यामुळे आजचा दिवस हा गटारी अमावस्या म्हणून प्रसिद्ध झाला व यासाठीच वैशिष्ट्यपूर्ण झाला हे दुर्दैव ! दारु, नशा, मांसाहार करायचा हा इव्हेंट झालाय त्यामुळे ह्या दिवसाचे महत्त्व तितके राहिले नाही. खरंतर दिव्याची मनोभावे पूजा करण्याचा हा दिवस. ह्या दिवसाला आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या असे ही म्हंटल्या जाते म्हणजेच आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते || पंचमहाभूतांमधील एक म्हणजे अग्नी देव ... त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा. दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हंटले आहे. २१ व्या शतकात एका बटणाने अख्ख घर प्रकाशाने उजळून जातं. इथे अग्नी दिसत नाही; डायरेक्ट प्रकाश दिसतो तरी अग्नीचं अस्तित्व आहेच ना? वीजनिर्मिती होते म्हणजे पाणी या पंचतत्व...