प्रत्येक शहराची युनिक आयडेंटिटी असते, तशीच मुंबईचीही आहे. दहीहंडी, डबेवाले, वडापाव अशा विविध कल्पना मुंबईमध्ये जन्माला आल्या. याच नगरीत चाळीने जन्म घेतला. ह्याच चाळींनी स्वातंत्र्य संग्राम ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा पहिला. काळाच्या ओघात चाळी मोडकळीस येऊ लागल्याने या मधील रहिवाशांनाही पुनर्विकासाचे वेध लागलेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चाळींचा जन्म ते चाळींचे जतन या विषयीचा हा आढावा. चाळी फक्त मुंबईतच आहेत असे नाही. दुसऱ्या शहरांमध्येही होत्या आणि आहेत; पण मुंबईमध्ये जेवढ्या चाळी आहेत, तेवढ्या इतर शहरांमध्ये नाहीत. ब्रिटिशांनी सैनिकांसाठी बांधलेल्या बॅरेकवरूनच इंग्रजांच्या काळात मुंबईत चाळी प्रथम उभारण्यात आल्या.
मेट्रो सिनेमामागील परिसराला धोबीतलाव म्हणतात. तिथे सैन्याचे बॅरेक होते. ज्याला मरीन लाइन्स म्हणायचे. या बॅरेक पद्धतीची घरे मुंबईत बांधण्यास सुरुवात झाली असा एक समज आहे; पण कागदोपत्री याची कुठेही नोंद नाही. ‘क्वारेंता’ म्हणजे चाळीस या पोर्तुगीज शब्दावरून मराठीमध्ये चाळ हा शब्द आला आहे असा ही एक समज आहे. काळाघोडा परिसरापर्यंत मुंबईचा किल्ला होता. यामध्ये उच्चभ्रू वस्ती होती व मध्यमवर्गीय क्रॉफर्ड मार्केटच्या पुढील भागात राहत होते. तिकडे पहिल्या चाळी येण्यास सुरुवात झाली. एका लहानशा खोलीमध्ये पाच ते सहा लोक राहत असत. आतमध्ये अंघोळ करण्यास मोरी आणि बाहेर शेअर टॉयलेट अशी त्याची रचना होती. त्या वेळी उच्चभ्रू व्यक्तींच्या घरातही टॉयलेट नसायचे. पारशी लोकांनी चाळी बांधण्यास प्रथम सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या गावावरून येणाऱ्या मजुरांच्या वास्तव्यासाठी चाळी बांधण्यास सुरुवात केली. विधवा महिलांसाठीही वेगळ्या चाळी बांधल्या. आजही क्रॉफर्ड मार्केट परिसरात पारशी चाळी आपल्याला दिसतात. शिक्षित आणि श्रीमंत असलेल्या पारशी समाजाने चाळीतून बाहेर पडत, पारसी बाग उभारल्या, अशा गेटेड कम्युनिटी कॉन्सेप्ट पारशी लोकांनी पहिल्यांदा आणली.
"बीआयटी" चाळींची बांधणी १८९६ मध्ये प्लेगची साथ आली तेंव्हा सुरू झाली. आठवड्याला पाच हजार लोक मरत होती. लगोलग सरकारने मुंबईची साफसफाई करायची ठरवली. यासाठी त्यांनी बीआयटी म्हणजे बॉम्बे इंप्रूव्हमेंट ट्रस्ट असा एक ट्रस्ट चालू केला. या ट्रस्ट द्वारा त्यांनी रस्त्यांवर आणि घरांवर काम केले. घरांचे लोअर, मिडीयम आणि हाय इन्कम ग्रुप असे प्रकार केले. आताच्या चौपाट्यांच्या बाजूला लागून दिसणाऱ्या इमारती, गावदेवीमधील बंगले हे हाय इन्कम ग्रुपमधील लोकांकरिता. मध्यमवर्गीय लोकांसाठी त्यांनी हिंदू कॉलनी, शिवाजी पार्क, खार, चेंबूर अशा विविध ठिकाणी घरे बांधली. यापूर्वी घरबांधणीसाठी चुना आणि लाकडाचा वापर होत होता. पुढे सिमेंट आले. गिरगावातील चाळींची रचना पाहिल्यास कमीत कमी जागेत अधिक घरे बांधलेली आढळतात. त्या वेळी खेळती हवा, सूर्यप्रकाश असावा अशी घरे उभारली.
असंख्य चळवळींचा साक्षीदार १९१८ होता आणि त्याच काळात मुंबईत स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली. तेव्हा आणखी एक नवीन संस्था सरकारने स्थापन केली. या संस्थेचे नाव होते "बीडीडी" अर्थात बॉम्बे डेव्हलपमेंट डायरेक्टोरेट. गिरणी कामगारांच्या घरबांधणी साठी ही संस्था निर्माण केली. या संस्थेने शिवडी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी येथे घरे बांधली. वरळीमध्ये सर्वाधिक जागा होती, या ठिकाणी मैदान निर्माण केले. सध्या असलेले जांबोरी मैदान हे त्यापैकी एक. याच मैदानातून महात्मा गांधींनी भाषण दिले आहे. या मैदानाच्या बाजूला "ललित कला भवन" होतं, काम करणाऱ्या महिलांची लहान मुले ठेवण्यासाठी सुविधा निर्माण केली होती. दलित चळवळी आणि दहीहंडीचा जन्मत्या काळात दलित साहित्याचा जन्म बीडीडी, बीआयटी चाळींमध्ये झालेला आहे. चाळीतील संस्कृती ही खुली होती. कोणाची दारं लॉक नसायची. कुणाचे पोर कुठेही जाऊन जेवायचे. सणाला सर्व जण एकत्रित यायचे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्म याच चाळींत झाला तर दहीहंडीचा ही जन्म चाळीतलाच.
अनेक लेखक व नाटककार, इतिहासकार या चाळीतूनच जन्माला आले. परंतु या चाळींमुळे साहित्य क्षेत्रात गाजली ती पु. ल. देशपांडे यांची ‘बटाटयाची चाळ’. ही चाळ साहित्यात अजरामर झाली. मराठी साहित्य आहे तोपर्यंत बटाटयाची चाळ जिवीत राहील.
चाळींमध्ये अपुऱ्या सुविधा, कुटुंबातील सदस्यांची वाढती संख्या आणि मुंबईत दुसरे घर घेणे परवडत नाही; त्यामुळे लोक नाइलाजाने मुंबईलगतच्या शहरात जाऊ लागले. जग बदलते आहे. स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा ह्याच चाळीतून जन्माला आला ह्याचा मात्र विसर पडता कामा नये. हे जागते हेरिटेज आपण जतन केले पाहिजे. नाही का ?
Comments
Post a Comment