भारतात दर शंभर किलोमीटरवर भाषा बदलते, खाण्या पिण्याच्या आवडीनिवडी बदलतात असं आपण नेहमीच बघतो. प्रत्येक भागातील बोलण्याचा लेहजा वेगळा, कुठे तिखट जास्त आवडीने खल्लं जातं तर कुठे गोड खाण्याची आवड जास्त असते. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपण बघतो, की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भाच्या मानाने तिखट आवडणारी लोकं कमी असतात. संपूर्ण राज्यात आवडणाऱ्या एका पदार्थाचं नाव सांगणं कोणालाही कठीण जाईल.
हे असं जरी असलं तरी देखील मुंबईचा "वडापाव" हा खमंग आणि रुचकर पदार्थ प्रत्येक माणसाच्या मनात घर करून बसला आहे. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन गोष्टी म्हणजेच लोकल ट्रेन आणि वडापाव! घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकराला कधी एका ठिकाणी निवांतं बसून खाण्याचा सुद्धा वेळ नसतो, मात्र अशा वेळी वडापाव हा चाकरमानी उपाशी राहू नये याची खबरदारी पुरेपूर घेतो. गरीब श्रीमंतं, लहान-मोठा असा कोणताच भेद न करता गल्लीच्या कोपऱ्यापासून ते पार फॅन्सी हॉटेल मध्ये सुद्धा तुम्हाला वडापाव सहज पाहायला मिळतो. लुसलुशीत पावात तिखट गोड चटणी आणि कुरकुरीत तळलेला गरम वडा म्हणजे एखाद्या खवय्यासाठी पर्वणीच! या अस्सल देशी फास्ट फूडचं सेलिब्रेशन करण्यासाठी आज २३ ऑगस्ट हा जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो.
सकाळी ऑफिसला जातांना असो किंवा संध्याकाळी घरी येतांना पार्सल असो, वडा-पाव हा आपल्याला १० पावलांवर सहज मिळतो. तुम्ही कारमधून कुठे तरी जात असाल किंवा बस स्टॉपवर उतरलेले असा किंवा लोकलचा प्रवास करून स्टेशनच्या बाहेर येत असाल, रिमझिम पाऊस पडत असेल आणि गरमा गरम वडा-पावचा वास येत असेल तर त्या वडा-पाव च्या गाडीकडे न वळता घरी जाणं एक आव्हान असतं. अगदी गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनी वडापावची चव चाखली आहे. वडापाव न आवडणारी व्यक्ती तशी दुर्मिळच आहे.
डोसा, पोहे, दाबेली, भेळ, पाणी-पुरी सारखे पर्याय उपलब्ध असतांना कोणी ‘वडापाव’ पहिल्यांदा विकला असेल? त्याचा जन्म कसा झाला ? कोणत्या गाडीवरून वडापावची सुरुवात झाली असेल? तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊया...
१९६६ मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी “मराठी माणसानेसुद्धा दक्षिणेकडील लोकांसारखा, नाश्त्यासाठी एखादा पदार्थ शोधावा” अशी हाक दिली होती. साबुदाणा वडा, मेदूवड्यासारखे बरेच प्रयोग त्यावेळी करण्यात आले. पण, या सर्वात बाजी मारली ती बटाटा वडा आणि पाव या दोन्हींना एकत्र आणून त्यावर पुदिना चटणी या मिश्रणाने. वडा आणि पावला एकत्र आणण्याचं आणि लोकांना काही तरी ‘वेगळं’ देण्याचं श्रेय ‘अशोक वैद्य’ यांना जातं. या आवाहनाने प्रेरित झालेल्या वैद्य ह्यांनी दादर स्टेशनच्या बाहेर वडापावचा पहिला स्टॉल सुरू केला होता. वरळी, परेल सारख्या भागात काम करणारे हजारो कामगार हे दादर स्टेशन वरूनच येणं जाणं करायचे. वैद्य आधी ह्या स्टॉल वर पोहे, बटाट्याची भाजी पोळी आणि ऑमलेट पाव विकत. एक दिवस सहज म्हणून त्यांनी बटाट्याच्या भाजीचे गोळे करून बेसनाच्या पिठात घोळवून तळले व पावत घालून विकले. हा प्रयोग काही क्षणातच सुपरहिट झाला. असा आपल्या वडापावचा जन्म झाला.
कोणतंही ‘पेटंट’ किंवा ‘कॉपीराईट’ नसलेला हा वडापाव काही दिवसातच मुंबईतील सर्व गर्दीच्या ठिकाणी मिळू लागला. नोकरीवर जातांना किंवा कामासाठी दिवसभर बाहेर फिरणाऱ्या लोकांसाठी वडापाव हे ‘ऑन द गो’ खाणं ठरू लागलं. ‘किंमत कमी आणि चवीची हमी’ असलेला वडापाव लोकांच्या लक्षात राहू लागला, चर्चिला जाऊ लागला! हल्लीच्या ह्या पिझ्झा आणि बर्गरची आवड असलेल्या पिढीला ही आपल्या मराठमोळ्या पदार्थाने अक्षरशः मोहून टाकलं.
१९७०-८० च्या काळात मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर कित्येक लोकांची नोकरी गेली होती. घर चालवण अवघड झालं होतं. सेवानिवृत्त झालेल्या कित्येक गिरणी कामगारांनी घर चालवण्यासाठी तेव्हा वडापावच्या गाड्या सुरू केल्या. आपल्याला दहा रुपयात मिळणाऱ्या या वडापावने गिरणी कामगारांच्या घरातील चूल पेटवण्यास मदत करून लोकांच्या संसारात लाख मोलाचं काम केलं होतं. कामाला जाणाऱ्या वर्गाचे स्नॅक म्हणून वडापावची ओळख निर्माण झाली. स्वस्त आणि खाण्यास सोयिस्कर. यामुळे लोकांमध्ये वडापावची लोकप्रियता वाढली. अशोक वैद्य यांच्या वडापावचे स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे हे खूप मोठे फॅन होते. ते नेहमी वैद्य यांचा वडापाव मागवायचे. त्यांनी बृहनमुंबई महानगरपालिकेला “अशोक वैद्य यांच्या वडापाव च्या गाडीला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे” असं सुद्धा सांगून ठेवलं होतं.
१९९० च्या दशकात भारतात मॅकडॉनल्ड्स चे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं प्रेम काही कमी झालं नाही. याचं कारण म्हणजे मॅकडॉनल्ड्सचा बर्गर जगात कुठेही खाल्ला तरी त्याची चव सारखीच असते. पण, प्रत्येक वडापावची गाडी चालवणारे हे आपल्या पद्धतीने वडापाव खमंग, तिखट, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मिरची सोबत देऊन तयार करतात. भारतीयांना हा बदलच खूप आवडतो. ‘रोज चवीला काही तरी वेगळं असावं’ अशी अपेक्षा असणाऱ्या मराठी माणसांनी मुंबईत वडापावला पसंती दिली व हळूहळू हा आपला मुंबईचा वडापाव पूर्ण राज्यात प्रसिद्ध झाला. आता ह्या पदार्थाने आपली ओळख महाराष्ट्रभर बनवली आहे. इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात, खास करून मुंबईत आल्यावर आधी वडापाव वर ताव मारतात.
२१ व्या शतकात आपल्या वडापावला सुद्धा ‘कॉर्पोरेट लूक’ मिळाला. ‘जम्बो किंग’ सारख्या चेन ने वडापाव ला ‘इंडियन बर्गर’ म्हणून लोकांसमोर आणलं आणि त्याची लोकप्रियता अजूनच वाढली. लोकांची पहिली पसंती ही नेहमीच गाडीवरच्या वडापावला असली तरीही वडापाव च्या ‘फ्रॅंचायझी’ व्यवसाय स्वरूपाला सुद्धा लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या वडापावने एक वेगळी छाप निर्माण केली आहे.
तर अशी होती मुंबईत एका छोटेखानी रेल्वेलगत गाडीवर सुरु झालेली ही वडापावची परंपरा, आज जगविख्यात आहे.
Comments
Post a Comment