'वासुदेव आला हो वासुदेव आला' हे ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर चित्रं उभं राहातं ते म्हणजे सकाळच्या रामप्रहरी मोराची टोपी घातलेला एक माणुस. दिवसाची सुंदर, पवित्र सुरुवात करुन देण्याचं, लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं काम हा 'वासुदेव' करत असतो. पूर्वी पहाटेला जात्याच्या घरघरीतून ओव्या गायल्या जायच्या. त्याचवेळी- 'वासुदेव आला हो वासुदेव आला' असे गाणे गात एका हातातली चिपळी व दुसऱ्या हातातले टाळ वाजवीत अंगणात वासुदेव आलेला असायचा. डोक्यावर मोरपिसांची किंवा निमुळती होत गेलेली कपड्यांची लांब टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, घोळदार अंगरखा, त्याखाली धोतर किंवा विजार, कमरेला शेला, त्यात रोवलेला पावा, पायात चाळ, एका हातात पितळी टाळ तर दुसऱ्या हातात चिपळ्या, काखेत झोळी आणि मुखात अखंड हरीचं नाव घेत दिसणारा वासुदेव आपल्या अंगणात आला की, प्रत्यक्ष श्रीकृष्णच भेटीस आलाय असे वाटायचे. मग घरातील आयाबाया, पोरेबाळे त्यांचे दर्शन घेत. त्यांच्या झोळीत सुपातून धान्य टाकीत, हातावर आणा ठेवीत.
तसं पहायला गेलं तर वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच आहे किंवा होती असे आता म्हणायला हरकत नाही. अर्थात 'वासुदेव' या परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली कुणास ठाऊक पण ती किमान १००० - १२०० वर्षापुर्वीची तरी नक्कीच असावी. असं म्हटलं जातं की ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. व्यवसायाने जरी हे लोक धार्मिक भिक्षेकरी असले तरी पुराणातुन हे समजतं की एका ब्राह्मण ज्योतिषास कुणबी स्त्रीपासून सहदेव या नावाचा पुत्र झाला आणि ह्या सहदेवापासून आपली जात उत्पन्न झाली व हेच आपले पुर्वज आहेत असं ह्या जातीचे लोक हक्काने सांगतात. भिक्षा मागून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आणि घरातल्या मुलाला योग्य वेळी भिक्षा मागण्याची दीक्षाही समारंभपूर्वक दिली जाते. हे वासुदेव जरी भिक्षेकरी असले, तरी ते भिकारी गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा वाढणे हा आपल्या हिंदु धर्माचरणाचा अविभाज्य भाग मानला जातो. रामपहाटेच्या वेळी रामकृष्णांचा नामघोष करीत ते येतात. मुळातच कृष्णभक्ती हा त्यांच्या आयुष्याचा पाया असल्याने त्यांच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. याच तालावर ते सुंदर धार्मिक गाणी गातात आणि नाचतात. गावातील माऊल्या त्यांना धान्य, पैसे देतात. हे दानही वासुदेव विशिष्ट पद्धतीने स्वीकारतो. दान देणाऱ्याला तो त्यांच्या वाडवडिलांचे नाव विचारतो आणि त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान 'दान पावलं र, देवा दान पावलं' असे गाणे म्हणून पोचते करतो. पंढरपूरचा 'इट्टोबा, तुळजापुरची 'भवानी', कोल्हापूरची 'अंबाबाई', जेजुरीचा 'खंडूबा', आळंदीचा 'ज्ञानबा', देहूचा 'तुका', अशा सर्वांना वासुदेव दान पावल्याचे सांगतो. म्हणजे हे दान वासुदेवाच्या हातात पडत असले, तरी वासुदेवाची भावना ते दान देवदेवतांना व संतांना पोचविण्याची असते. दान पावल्यानंतर वासुदेव मनाला मोहुन टाकणारा पावा वाजवतो आणि स्वतःभोवती गिरक्या घेत अगदी प्रसन्न होऊन मंदमुक्त होऊन नाचतो.
कधी काळी गाव जागवत येणारा हा वासुदेव आता उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय. पण त्याला आता कुठेच हक्काचं दान मिळत नाहीये... कोकणात एकदा भाताची सराई पिकली की दिवाळीचे दीप मावळल्यावर घाटावरून नाना मांगतेकरी कोकणात यायचे. त्यात दरसालचा नंदीबैल प्रमुख. त्याच्या जोडीला सुया घ्या, पोत घ्या करीत विकणाऱ्या गोसाविणी, जादूवाला, डोंबारी, गुण्याबैल, जरीमरीचा भगत, ज्योतिषी असे कितीतरी जण आपल्या आयुधांसह लोकांचे मनोरंजन करीत भिक्षा मागत गावोगाव फिरत असतात. त्यात वासुदेव विरळा. पूर्वी वासुदेवाला आदराने, दान दिले जायचे पण हल्ली पैसे अंगावर फेकून दिले जातात.... झोळीत धान्य तर पडतच नाही.
वासुदेव पूर्वी गाव जागवीत यायचा. लोकांना ते श्रीकृष्णाचे रूप वाटायचे. आता कामावर जायला लोक वासुदेवाच्या आगमनाआधीच जागे झालेले असतात. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांना हरिनामात आजकाल मौज वाटत नाही. गल्ली-रस्त्यातून गात जाणारा वासुदेव आजही कधीतरी दुरून दिसतो. कोणी बोलावलं, तर येतो. नाहीतर नाइलाजाने आल्यापावली निघूनही जातो. पण एकूण त्याचं गाणं आणि दर्शन आता हळूहळू कमी कमीच होत चाललेलं आहे. आजच्या टच स्क्रीनच्या जमान्यात मुलांना सकाळी जागवणाऱ्या वासुदेवापेक्षा रात्री उशिरा येणारा सांताक्लॉज अधिक जवळचा वाटू लागला आहे. सांताक्लॉज म्हणे मुलांना गिफ्ट देतो. म्हणून ती त्याची वाट पाहतात. पण आपल्या मराठी मातीतल्या, आपल्या लोकपरंपरेचा वारसा पुढे चालवणाऱ्या साध्या भोळ्या वासुदेवाचा मात्र आज सर्वांनाच विसर पडत चालला आहे. नव्या पिढीला वासुदेवाचं आकर्षण वाटत नाही. अनेकांना त्याच्याबद्दल माहितीही नाही. अजूनही ग्रामीण भागात वासुदेव बरेचदा येतो. पण त्याची हाक सर्वांपर्यंतं पोहोचत नाही किंवा पोहोचली तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही. ह्या आणि अशा अन्य काही गोष्टींमुळे आपण आपल्याच 'वैभवाला' हरवत चाललो आहोत....
Comments
Post a Comment