आजच्या धावत्या युगात ही आपल्या परंपरेशी नातं जोडून ठेवणारे प्रसंग खूप कमी पाहायला मिळतात. त्यातला एक प्रसंग म्हणजे आषाढ महिन्यात पंढरपुरात ठिकठिकाणाहून येणाऱ्या दिंड्या. वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलींना ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते ते त्याच्या माऊलीची. हे दृश्य म्हणे बघण्यासारखं असतं, फक्त ऐकून होते. यावर्षी अनुभवायचं ठरवलं. प्लॅन आखला गेला खरा, पण शेवटच्या क्षणी पायाला इजा झाल्या मुळे तो अमलात आणता आला नाही. म्हणतात ना योग जुळून यावा लागतो, तो बहुदा नसावा. बाकीच्या कामात व्यस्त झाले आणि हा हा म्हणता आषाढी एकादशी परवा वर येऊन ठेपली. इच्छा प्रचंड होती पण वाट सापडत नव्हती. पण म्हणातात ना 'देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन होतं’... शेवटी तो योग आलाच जुळून. माझी ही पहिलीच वेळ वारीची.

मुंबईहून निघाल्यापासून पंढरपुरात पोहोचे पर्यंत मनात असंख्य विचार होतेच - एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग 'एक' होतो कसा? एवढा मोठा प्रवास हे वारकरी इतक्या सहजतेने कसे पार करू शकतात? वारीत माणूस जुन्याचा नवीन होतो म्हणजे काय होतं? हेच सगळं अनुभवायला खरं तर मी वारीला चालले होते व एक अतिशय "मंत्रमुग्ध" करणारा अनुभव मिळाला. मनाच्या पटलावर पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली खरी पण त्यातून अनेक नवनवीन प्रश्नांचा जन्म देखिल झाला. निस्सीम भक्तीची आणि सांस्कृतिक वारश्याची एक सुंदर गुंफण बघायला मिळाली. टाळ-चिपळ्यांच्या नादात, 'ज्ञानेश्वर माऊली... ज्ञानराज माऊली तुकाराम' च्या गजरात सर्व भान हरपून माऊलींच्या उत्कट भक्तीभावात सर्वजण विरघळून गेलेले दिसले. प्रत्येकाला एकच ओढ होती, ती म्हणजे फक्त सावळ्या विठोबाच्या भेटीची. म्हणून पाऊलांची गती आपोआपच वाढायला लागते. आपल्या शहरी जीवनात फर्लांगभर अंतरासाठी वाहन करणाऱ्यांना एक दिवसात अमुक तमुक कि.मी. अंतर कापणे किती कठीण असते; पण इथे ही किमया फक्त माऊलीच्या ओढीमुळेच घडू शकते व सोबत काळजी वाहणारी ज्ञानोबा माऊली असतेच की. मधेच हजारो टाळांच्या गजरातून 'ज्ञानोबा माऊली' असे शांत स्वर ऐकू येयचे. तेव्हा शरीरावर रोमांच उभा राहायचा. लाखो वारकरी विठूचा गजर करून हरिनामाचा झेंडा घेऊन चालत होते. प्रत्येक दिंडी एका विशिष्ठ प्रकारे चालत असते, आधी येतात भगव्या रंगाचे ध्वज नाचवणारे वारकरी मग येतात त्या डोक्यावरती तुळस घेऊन माऊलींचा जप करणाऱ्या महिला, त्यांच्या मागोमाग टाळकरी व भजनी मंडळांचा समूह आणि सर्वात शेवट म्हणजे दिंडीसह चालणारे भक्तगण, अखंड हरिनामाचा जप करत. इथे प्रत्येक वारकरी हा 'माऊली' असतो तेव्हा ना कोणी लहान असतं ना कोणी मोठं, ना कोणी स्त्री ना कोणी पुरुष. प्रत्येक माऊली एकमेकांच्या पाया पडतात, इथे ही कोण लहान कोण मोठा किंवा कोणत्या जातीचा हे बघत नाहीत. ह्या पाया पडण्यात पण बघा कशी गंमत आहे, आपण आपला सगळा अहंकार आणि मनातली कस्पटे त्या विठ्ठलाच्या पायाशी त्यागतो व नवीन उमेदीसाठी आणि वाटचालीसाठी आपण शरण जातो. आपण पाया त्या व्यक्तीच्या पडत नसतो, पडत असतो ते त्याच्यातल्या माऊली रूपाला. चरा चरात देव वसतो आणि हे वारकरी तर साक्षात परमेश्वराचे दुसरे रूप जणू. वारीत चालताना जात-पात, उच्च-नीच, भाषा, गरीब-श्रीमंत इ. सारे भेदभाव उन्मळून पडतात. प्रत्येकाच्या मुखी एकच शब्द-'माऊली माऊली'. प्रपंचाची आठवणसुद्धा नसते. 'मी' पण आपोआपच गळून पडते आणि आपण शरण जातो त्या परमेश्वराला. तुमच्या विचारांना एक लय मिळते, नकारात्मकता जाऊन एक सकारात्मक ऊर्जा अंगी भिनते. तुमच्या मनातली कटुता हळू हळू नष्ट होऊन तुम्ही तुम्हालाच नव्याने ओळखू लागता. वारीमध्ये अजून एक गोष्ट समजली, इथे येणारा ९० टक्के समाज हा गरीब परिस्थितीतून आलेला असतो; मात्र त्यांचा विठू माऊलीसाठी असलेला भोळाभाबडा भाव पाहिला की, वाटते आपण शहरी माणसे फक्त पोशाखी आहोत. आपल्याला वारी करायची असते, पण सर्व गरजा सांभाळून, त्याचे मात्र तसे नसते. एके ठिकाणी ४-५ वारकरी बसले होते. बोलता बोलता समजले की, दरवर्षी ते वारीला येतात; पण पैसे नसल्यामुळे कर्ज काढतात व पांडुरंगाचे दर्शन घेतात. ऐकून मला धक्काच बसला. विठूरायाच्या दर्शनासाठी त्यांना कर्जाची गरज लागते व आपण ऐहिक सुखासाठी कर्ज घेतो. किती हा विरोधाभास! ह्या विचारांची लय तोडली ती एका अभांगाने ।।'पंढरीचा वास, चंदभागे स्नान। आणिक दर्शन, विठोबाचे।। अवघा आसमंत विठूमाऊलीच्या गजराने दुमदुमून गेला होता आणि त्याच सोबत भागवत धर्माची पताका आकाशात उंच फडकताना दिसत होती.
आता तुम्हाला वाटेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे पण तसं नाहीय, परंपरा आणि अंधश्रद्धा ह्यात सूक्ष्म रेख आहे. ही अखंड चालतं आलेली लाखो, करोडो भक्तगणांची श्रद्धा आहे. वारीत अगदी महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभरातून भक्तगण तितक्याच ओढीने येतात. वारी ह्या विषयी म्हणे पी. एच. डी. ही करता आहेत परदेशातील लोक. हीच तर ताकद आहे ज्ञानोबा आणि तुकोबांच्या विचारांची. त्यांचे विचार फक्त अध्यात्मिक नाहीत तर त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची एक सुंदर झालर देखील आहे. आपल्या देशाला लाभलेला हा सुंदर असा धार्मिक वारसा आहे जो जतन करायला हवा.
Comments
Post a Comment