
पंचमहाभूतांमधील एक म्हणजे अग्नी देव ... त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा. दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हंटले आहे. २१ व्या शतकात एका बटणाने अख्ख घर प्रकाशाने उजळून जातं. इथे अग्नी दिसत नाही; डायरेक्ट प्रकाश दिसतो तरी अग्नीचं अस्तित्व आहेच ना? वीजनिर्मिती होते म्हणजे पाणी या पंचतत्वापासून ऊर्जा तयार होते. काही अघटित घडलं तर अग्नीतत्वाचाच भडका दिसतो ना? म्हणूनच ज्योत दिसत नसली तरी या प्रकाश निर्माण करणाऱ्या अग्नीला आपण आजही नमस्कार करायला हवा! प्रकाश मिळवण्याची पद्धत बदलली तरी मनोभाव तोच. ट्यूबलाइटचा असा लख्ख प्रकाश असला तरी समईची, पणतीची ज्योत खूप शांत, पवित्र, मंगलमय वाटते यावर कोणाचं दुमत नसेल!
दीप अमावस्येला आषाढ महिना संपतो. श्रावणात ऊन पावसाचा खेळ बघायला मिळतो, सण सुरु होतात आणि भाद्रपदात आभाळ पुन्हा अंधारून येतं, पाऊस कोसळतो, दिवसही लहान होतो, अंधार लवकर पडू लागतो त्यामुळे पुर्वी कामाच्या वेळात अंधार संपवायला या दिव्याची गरज भासत असे. म्हणून संध्याकाळी लवकर दिवा लावायला सुरवात करण्यात आली. धुळीत माखलेले, दिवाळीनंतर बांधून ठेवलेले लामणदिवे, समई, निरांजन घासून पुसून अगदी लख्ख करून दीप अमावस्येला लावण्यासाठी तयार असायचे. या दिवशी पाटावर सर्व दिवे ठेवत, पाटाभोवती रांगोळी काढून फुलं व हळदकुंकू वाहत, छान गोडाचा नैवेद्य दाखवत आणि सर्व दिवे प्रज्वलित करुन वातावरण प्रकाशमान करत. काही ठिकाणी कणकेचे, पुरणाचे किंवा ओल्या मातीचे दिवे ही लावण्याची पद्धत असे. थोडक्यात आपापल्या कुवतीनुसार सण साजरा करायचे. इथे बाकीचे सोपस्कार महत्वाचे नाहीतच तर कृतज्ञता हा भाव मनात असणं महत्वाचं आहे.
आपल्या उपयोगी पडणाऱ्या प्रत्येक वस्तूची, सजीवाची जाणीव ठेवायची, आभार मानायचे, कृतज्ञता व्यक्त करायची. हा आपल्या जीवन पद्धतीने दिलेला विचार आहे; हा एक संस्कार आहे. अंधार नाहीसा करणारी ही ज्योत पंचतत्वातील अग्नीचं सुद्धा रुप आहे. काटक्यांवर काटक्या किंवा दगडावर दगड घासून खूप कष्टाने आणि काळाने अग्नी प्रज्वलीत होतो. थोडक्यात तो लाकडाच्या, दगडाच्या आत कुठेतरी सूक्ष्म रुपात असतो. तसाच तो आपल्यामधील सूक्ष्म देहात आहेच. त्यामुळे वेगवेगळ्या रूपात असणाऱ्या अग्नीचे आभार मानण्याचा हा दिवस.
डोळ्यांना दिसतो तोच अग्नी असं खरंतर नाही! अन्न पचवण्यासाठी लागणारा जठराग्नी, राग निर्माण करणारा क्रोधाग्नी, द्वेष पेरणारा द्वेषाग्नी, वाहन, यंत्र अगदी प्रत्येक अणू रेणुत अग्निच आहे. याच्याच साक्षीने प्रेमाग्नी फुलतो, नाती जुळतात व वाढतात. अग्नीची ज्योत कायम गुरूत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने जाणारी, मुक्त होण्यासाठी वरच्या दिशेने झेप घेणारी. दया, प्रेम आणि कृतज्ञता यामधील अग्नी अहंकाराला भस्मसात करतो म्हणून भस्म लावणं हे प्रतिकात्मक असलं तरी त्यामागील उद्देश 'अहं' भाव संपवणं हा आहे. या ज्योतीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण आपल्यामध्ये तीच प्राणज्योत आहे म्हणून आपले अस्तित्व आहे.
पंचतत्वातील हे अग्नीतत्व रोगराई नष्ट करते, अंधार, नकारात्मक लहरी नष्ट करते. असा प्रकाश आणि ऊर्जा देणाऱ्या या अग्नीचे आपण आभार मानायला हवे ना? या २१व्या शतकात आपलं आयुष्य नुसतं धावतंय, या यंत्रयुगात आपण निसर्गशक्ती पासून दूर जात आहोत पण काहीही झालं तरी प्रत्येक गोष्ट पंचतत्वातूनच जन्म घेते आणि पंचतत्वातच विलीन होते; या पंचतत्वांबद्दल मनात कायम कृतज्ञतेची भावना हवीच. वेगवेगळे पाश्चात्य देशातले 'डेज' साजरे करताना जस कूल वाटतं तसंच आपले ही असे सण मनोभावे साजरे करायला शिकलं पाहिजे.
या दीप अमावस्येला कृतज्ञतेचा भाव ठेवून दिव्यांची म्हणजेच अग्नी या तत्वाची पूजा करुया, कोणताही बडेजाव, रंगरंगोटी न करता देवासमोर किंवा कुठेही दिवा लावून मनात कृतज्ञतेचा, आभारी असण्याचा भाव ठेवून ही पूजा करूयात आणि येणाऱ्या श्रावण मासाचे स्वागत करूयात
.
Comments
Post a Comment