सध्या सात बेटांवर दिमाखात वसलेल्या या मुंबईवर आजतागायत अनेक परप्रांतीयांनी आक्रमणे करून आपला शिक्कामोर्तब करून मुंबईला काबीज करायचा प्रयत्न केला. मुंबई ही स्वतःची जागीर असल्याप्रमाणे, स्वतःला हवा तसा, स्वतःच्या फायद्यासाठी तिचा वापर करून घेतला आहे. मुंबई कोणाची हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे, कोणाची आहे ही मुंबई ? कोण होते इथले मूळ रहिवाशी ?
पाचशे हुन अधिक वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या ह्या मुंबई शहरावर अगदी मौर्यांपासून ते अशोका पर्यंत अनेक साम्राज्य येऊन गेली. नंतरच्या काळात सातवाहनांनीही मुंबईवर ताबा मिळविला. त्यांच्यामध्ये कोल हे सातवाहनांचे सरदार होते. कोलवरून कोलीय वंश आणि कोळी असे नामकरण झाले असावे असे सिद्धांत मांडले गेले. एकंदरीत मिळालेल्या पुराव्यांवरून कोळी समाज मुंबईतील मूळचा असल्याचे मानण्यात येते. मुंबईत आरंभी कोळी, भंडारी, पाठारे प्रभू व काही ब्राम्हण अशी वस्ती होती. मुंबईला, मुंबई हे नाव मुंबा आई देवीच्या नावाने दिलं गेलं आहे. १७३७ साली मुंबईच्या कोळी बांधवांनी बोरीबंदर येथे या मंदिराची स्थापना केली. सोळाव्या शतकात जेव्हा पोर्तुगीज पहिल्यांदा या भागात आले, तेव्हा त्यांनी याला विविध नावांनी संबोधले, ज्याने कालांतराने लिखित स्वरूपात बॉम्बेचे रूप धारण केले. हे नाव पोर्तुगालमध्ये अजूनही वापरात आहे. सतराव्या शतकात ब्रिटीशांनी नियंत्रण मिळविल्यानंतर, या भागाचे पूर्वीचे नाव इंग्रजीकरण झाले आणि ते बॉम्बे झाले. तथापि, मराठी भाषिकांनी मुंबई किंवा बॉम्बे असा उल्लेख केला, तर हिंदी भाषिक ते नाव वापरत राहिले. १९९५ मध्ये त्याला मुंबई असे नाव देण्यात आले. पोर्तुगीज शब्द बॉम्बे, ज्याचा अर्थ “उत्कृष्ट खाडी” आहे.
मराठी माणूस हा इथला मूळ रहिवाशी आहे परंतु या परप्रांतीयांच्या गर्दीत हा मराठी माणूस स्वतःचं अस्तित्व हरवून बसला. 'भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी' अशी गत झाली मराठी माणसाची. बाहेरून आलेले परदेशी, परप्रांतीय यांनी मराठी माणसाच्या भोळे भाबडे पणाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांना त्यांच्याच हद्दीतून बाहेर काढलं आणि आयत्या बिळावर नागोबा होऊन बसले.
याची खरी सुरवात झाली जेव्हा मुंबई पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांच्या ताब्यात आली. ब्रिटिशांना आपली व्यावसायिक बाजारपेठ प्रस्थापित करण्यासाठी मुंबई अगदी योग्य वाटली म्हणून त्यांनी सुरत येथे स्थित असलेले त्याचे मुख्यालय मुंबईत स्थलांतरित केले. याच कालावधीपासून मुंबईत परप्रांतीय येण्यास जास्त सुरवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा या बेटाचा ताबा आला तेव्हा मुंबईची अवस्था अत्यंत वाईट होती. परंतु थोड्याच काळात त्यांनी मुंबईचा कायापालट करून टाकला. प्रथम किल्ला बांधला आणि सात बेटांचा समूह असलेल्या मुंबईला एकसंध स्वरूप दिले व हळूहळू टप्प्याटप्प्याने ते मुंबईला विकसित करत गेले. त्यांनी ठाणे ते बोरीबंदर अशी पहिली रेल्वे सुरू केली त्याचबरोबर ट्राम, बसेस, टॅक्सी अशी इतर वाहतुकीची साधने आणली . १९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे सुंदर कलाकौशल्य असलेल्या इमारतींचे सुशोभीत असे समृद्ध शहर बनले.. मुंबई शहराचं औद्योगिकरण झालं, त्यामध्ये प्रामुख्याने कापडगिरण्या स्थापित झाल्या. कापड गिरण्यांनी उद्योजकतेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं, मुंबईचं रंगरूप पार बदलून टाकलं. रेल्वे, बंदरे आणि गिरण्या यांमध्ये रोजगार मागण्यासाठी लोक स्थलांतरीत होऊ लागली त्यामुळे मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. आणि मग तयार झाला एक मोठा वर्ग 'गिरणीकामगार'. बघता बघता मुंबईत अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या व मुंबई गिरणगाव ही नवी संस्कृतीच निर्माण झाली. १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईत ६७ गिरण्या व अडीच लाख गिरणी कामगार होते. या कामगारांमध्ये बहुतेक मराठी माणसांसह - युपी, बिहार, राजस्थान, गुजरात, कर्नाटक असे इतर प्रांतातून आलेले परप्रांतीय ही काम करत होते. त्यामुळे मुंबई आता फक्त मराठी माणसाची राहिली नव्हती, ती एव्हाना बहुभाषिक झाली होती.
इंग्रजांनी हा विकास स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या सोयीसाठी केला होता, कारण त्यांना इथे स्वतःची सत्ता गाजवायची होती, जवळ जवळ तीनशे वर्ष ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं. शेवटी १९४७ साली भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगीरीतून मुक्त झाला. पण तरीही मुंबई मध्ये खूप लोक जिवाची मुंबई करण्यासाठी पैसा कमावण्यासाठी, नोकरी धंदा करण्यासाठी दूर दूरहुन येतच राहिली, मराठी संस्कृती, हळू हळू ढासळत गेली, पेहरावापासून ते खाद्य संस्कृती पर्यंत सगळचं बदलत गेलं, मुंबई व तिचा मूळ मराठी माणूस 'अग माझे बायले, सारे तुला बाह्यले' प्रमाणे सदैव परप्रांतीयांना सामावून घेत राहिला आणि मग नंतर त्याचे विपरीत परिणाम दिसू लागले. बाहेरचे लोक येऊन उद्योग धंदे स्थापून मालक होऊन बसले आणि मराठी माणूस गुलाम तो गुलामच राहिला, तो त्याच्या नोकरीवरच खुश होता. भरारी मारण्याची भीती बाळगणाऱ्या या संकुचित मनोवृत्तीच्या मराठी माणसाने आपल्या कक्षा कायम सिमीतच करून ठेवल्या होत्या, त्या सगळ्यांचे प्रचंड परिणाम त्याला भोगावे लागले जेंव्हा गिरणी कामगारांचा संप होऊन गिरण्या बंद पडल्या.
मुजोर गिरणी मालक व भांडवलशाहीला शरण गेलेल्या सरकारची संप दडपून टाकण्याची भूमिका यामुळे १९८२ च्या दीर्घ काळ चाललेल्या ऐतिहासिक संपाचा अंत कामगारांच्या अधःपतनात झाला. बघता बघता सारा खेळच खलास झाला. बहुतेक सर्व गिरण्या बंद झाल्या. कामगारांची अख्खी पिढी बेकार झाली. यात भरडला तो निरपराध गिरणीकामगार. अनेक उत्तरप्रदेशीय कामगार भिवंडीला लूम्स चालवायला गेले. अनेकजण आधीच गावी जाऊन बसले होते. पण मुंबईच्या मनिऑर्डरीवर जगणारं कोकण या वाताहतीत अधिकच कर्जबाजारी झालं. मुंबईत तर कामगारांनी दागदागिने विकले, झालंच तर स्वतःच्या राहत्या जागा विकल्या. गिरण्यांच्या जमिनींवर मोठमोठी व्यापारी संकुले, गगनचुंबी इमारती व उंची हॉटेले आली. कामगार संस्कृती लयाला जाऊन व्यापारी संस्कृती उदयाला आली. मराठी माणूस मुंबईतून दिसेनासा झाला. आता ब्रिटिशांची मक्तेदारी जाऊन मुंबईवर परप्रांतीयांची मक्तेदारी सुरू झाली होती, याला जबाबदार कोण होतं ?
'आपलेच दात अन आपलेच ओठ' अशी गत होती मराठी माणसाची, व्यवसाय करणं हे मराठी माणसाच्या अस्मितेविरुद्ध असावं बहुतेक. मराठी माणूस उद्योगधंद्यात उतरू पाहत नाही आणि जर करायच म्हटलंच तरी त्याला इतरांचं सहकार्य लाभतही नाही. आपापसातील मतभेद, चढाओढ, पाय खेचणे इत्यादी प्रकरणामुळे त्याची पीछेहाट होत गेली. आजही आपण बघतो कामासाठी युपी, बिहार, राजस्थानची माणसे मिळतात पण मराठी माणूस पडेल ते काम करत नाही, आर्थिक दुर्बलता असली तरी मग्रुरी कमी होत नाही. स्वतः काही करायचं नाही, जो करतो त्याला करू द्यायचं नाही ही अशी मराठी मानसिकता. त्यात बहुतेक राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी माणसाचा वापर करून घेतात. परप्रांतीय मिळेल त्या पगारात मिळेल ते काम, पाहिजे तितका वेळ करण्याच्या सवयीमुळे त्यांना रिकामटेकडे बसायची वेळ कधी येतच नाही, त्यात सुरवातीला एक येतो मग एक एक करत लोंढेच्या लोंढे येतात, जिथे पाहावे तिथे सगळीकडे त्यांचच वास्तव्य दिसू लागलं.
आधी नोकरीधंद्यासाठी आलेले लोक नंतर मराठी माणसांची घरं बळकावून बसले, वाढती महागाई आणि आर्थिक दुर्बलतेमुळे मराठी माणूस मुंबई सोडून दुसरीकडे स्थलांतरित झाला, आता सध्याच्या परीस्थितीत हे परप्रांतीय, त्यांचे खाद्यपदार्थ, भाषा, राहणीमान न बदलता इथे रहातात. नुसतेच काम करत नाहीत तर स्वतःची संस्कृतीही जपतात आणि आपण आपली भेळ केली आहे. आपण हिंदी, मराठी, गुजराती इंग्लिश अशी मिक्स भाषा बोलतो. इडली, वडा सांबार, समोसा, ढोकळा, फाफडा, त्यात भर पिझ्झा बर्गर हे आपलं खाणं झालंय. ब्रिटिशांनी पाव काय आणला, आपलं पावशिवाय चालत नाही, कोणी बदलली आपली संस्कृती, आपली भाषा, आपलं राहणीमान, आपण स्वतःच ना ? मग काय फायदा आता मराठीचा टेंभा मिरवून? आपल्यासाठी ते लोक त्यांची संस्कृती बदलत नाहीत. आपल्याला दक्षिणेकडे गेल्यावर सगळी कडे इडली, डोसा, उपमा, उत्तप्पा हेच खायला मिळतं मुश्किलीने बोलले तर ते हिंदीत बोलतात नाहीतर त्यांची मातृभाषाच वापरतात. त्यांना सोयीस्कर व्हावं म्हणून आपण त्यांच्याशी हिंदी किंवा इंग्रजीत बोलतो, आपण आपल्याच राज्यात राहून आपली मातृभाषा सोडतो पण ते त्यांचा हेका सोडत नाहीत.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली तेंव्हा मराठी भाषेला न्याय देण्यासाठी १ मे १९६० साली, कामगार दिनी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी व नागपूरला उप राजधानी म्हणून घोषित केलं. अजूनही वेळ गेली नाही, मराठी माणूस जर उद्योगशील झाला, एकमेकांना सहकार्य केलं, मातृभाषेचा अवलंब केला तर मराठी संस्कृती जपून राहील नाहीतर काही खरं नाही...
Comments
Post a Comment