"आता किमान पंधरा - वीस दिवस बाहेर असणारेस."
"तिथे अजिबात चिडचिड करायची नाही. कोणावर ओरडायचं नाही. दोघे सोबत राहायचं. जपून राहायचं. सांभाळून राहायचं." समोर बसवून आईने, आजीने आणि बाबांनी हा उपदेश दिला. पण मी मात्र पुन्हा वारीला जाणार ह्याचं विचारामध्ये गुंग होते. मागच्या वर्षी वारीचा एक टप्पा कव्हर करता आला पण ह्यावर्शी मात्र पूर्ण वारी कव्हर करायला मिळणार ह्याचा आनंद, उत्साह आणि हुरहूर होती.

पुण्यातील वारीच्या मुक्कामापासून सुरु झालेला हा प्रवास, अनेक खेड्यापाड्यातून आलेल्या वारकाऱ्यांसोबत पहिल्यांदा संवाद साधण्याची वेळ, हे सगळंच नवीन होतं. वारकऱ्यांचे अफाट अनुभव ऐकून, त्याच्यामध्ये असणारा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीची जाणीव क्षणोक्षणी होतं होती. वासुदेवाच्या वेशात असणाऱ्या एका अवलीयाने दुष्काळ, स्वछता आणि युवकांचा वारीमधील सहभाग यावर ऐकवलेली ओपिनियन ऐकून तर अंगावर काटा आला. आम्ही दिवेघाटात सकाळी ११ वाजता पोहचलो आणि माऊलींची पालखी आली संध्याकाळी ६:३० वाजता. हा पहिलाच दिवस असल्याने दिवेघाटा कव्हर केल्यानंतर वारीत नको जायला असाही विचार मनात आला, कारण जोरदार पाऊस. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आम्ही पूर्ण भिजलो होतो, त्यामुळे ‘हे जमणार नाही, परत जाऊयात’ असे विचार मनात यायला सुरवातही झाली होती. मात्र कोसळणाऱ्या पावसातही केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही भौतिक गरजा सोबत नसताना वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना पाहून ‘जमेल आपल्यालाही’ हा प्रोत्साहनाचा डोस मिळाला. त्यामुळे आता पंढरपूर गाठायचेचं हा निर्णय मनात पक्का झाला. दिवेघाटाच्या या कव्हरेजने वाटेत किती खडतर समस्या येऊ शकतात, याची झलक दाखवली होती. त्यामुळे आम्ही सासवडच्या दिशेने तयारीनिशी निघालो. आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आजवरचं आयुष्य मुंबईत घालवल्यामुळे माझ्यासाठी गर्दी, गोंगाट आणि त्या गर्दीत वाट काढत चालणं हे रूप नवं नव्हतं.


असंच एकदा चालता चालता मागून आवाज आला. अनोळखी पण तितकीच जवळची वाटावी अशी हाक कानी पडली. एक आज्जी आवाज देत होत्या.
"ये इकडं"
विठ्ठलाच्या ओढीनं ही म्हातारी-कोतारी पंढरीच्या दिशेने निघतात. पण त्यांच्या मागे असतं ते त्यांचं घरदार, पोरंबाळ आणि लाडकी नातवंडं. त्यामुळे वारीत जी कोणी लहान मुलं दिसतील त्यांच्यात हे त्यांची नातवंडं शोधत असतात.तशीच मी त्यांच्यासाठी एक होते, त्यांची नात. हे सगळे आज्जी आजोबा खूप लाड करतात, "माझी नात भी तुझ्यावनीच हाय बघ" म्हणून हाताने गालाचा छोटुसा मुका घेतात आणि निघताना मात्र हक्काने "उन्हं तन्हाची लई फिरू नगं" म्हणून ताकीद देतात.
एकदा अशीच चालून चालून दमले म्हणून एका वारकऱ्यांच्या ग्रुपमध्ये बसले. तर त्या दिंडीतील माऊलींची चौकशी सुरू झाली. "कुठून आली?" "काय करते?" "सोबत कोण आहे?" "बाकीचे कुठेत?" "तुला एकटीला कसं सोडलं?" आणि काळजीपोटी एका आजीने सांगितलंही, "असं एकटी नाही फिरायचं, दोघी तिघींना बरोबर घेऊन फिरत जा. जमाना लई वंगाळ हाय". ही साधी आणि भाबडी माणसं खूप प्रेम देऊन जातात.
खूप वेगवेगळी माणसं भेटली या वारीत. वयाची बंधनं तोडून सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले होते. अगदी सहा-सात वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षांच्या आज्जींमधला उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्याच नव्वद वर्षाच्या अजींशी गप्पा मारल्यावर, जे लाडाने गालावरुन हात फिरवून कडाकड बोटं मोडीत, म्हणाल्या, "गो बाय खूप मोठी हो" हे आणि असेच आशीर्वाद खूप बळ देतात आयुष्यात.

आषाढी एकादशीचा दिवस आला, अवघे पंढरपूर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात नाऊन निघाले होते. तिथल्याच एका ब्रिज वरून मी पाहिलेलं चंद्रभागेच्या घाटाचं दृश्य डोळ्यांना आणि मनाला जे समाधान देऊन गेलं, त्याच्या वर्णनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या बंगल्यातून लाटा दिसतात तसं दृश्य माझ्या नजरेसमोर होतं. इथं होता माणसांचा समुद्र. लाखोंच्या संख्येनं घाटावर पुढे मागे चालणारे वारकरी समुद्राच्या लाटेसारखे भासत होते. वारकऱ्यांचा प्रवाह जेव्हा स्नानासाठी चंद्रभागेच्या प्रवाहात मिसळत होता तेव्हा एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या या दोन प्रवाहांचा मिलाप डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.

खूपच सुंदर अनुभव प्रांजल 👌👌.. असेच छान छान अनुभव share कर.
ReplyDelete